शिवसेना खासदाराच्या भरधाव कारने हरणाला चिरडले; चालकाला अटक

64

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका हरणाला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत संबंधीत हरणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित कार पोलिसांनी जप्त केली असून चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर वन्यजीव कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कार शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मालकीची आहे

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अध्यक्ष अन्वर अहमद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, २८ नोव्हेंबर रोजी उद्यानातून जात असताना शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या कार चालकाने एका हरणाला चिरडले. उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास गावित यांची एसयुव्ही कार उद्यानाच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्याचक्षणी गांधी टेकडीजवळ उभ्या असलेल्या एका हरणाला या कारची जोरदार धडक बसली.

या अपघातानंतर याची माहिती चालकाने स्वतःहून मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांना दिली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी हरणाला प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तोवर वाटेतच हरणाचा मृत्यू झाला होता.

अन्वर यांच्या माहितीनुसार, उद्यानात मुक्तपणे फिरणाऱ्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. यासाठी इथल्या अंतर्गत रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. इथून प्रवास करताना वाहनांनी २० किमी प्रतितास वेगाने वाहनं चालवण्याचे आवाहन करणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत