जिल्ह्यात ३१ मे पर्यंत १४४ कलम जारी

14

जळगाव;- देशात आणि राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या 2 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपुर्ण जिल्हा हद्दीत 31 मे 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 जारी करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आलेल्या कलम 144 नुसार या काळात कोणत्याही नागरिकास सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेदरम्यान अनावश्याकरित्या फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याकाळात सभा, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोजरंजानाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती/नागरिक भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी.

65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, 10 वर्षाखालील बालके, गर्भवती महिला, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच राहावे तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी यांना मुभा देण्यात आलेली आहे. तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या 144 कलमाचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.