केरळमध्ये ९० वर्षांच्या जोडप्याची कोरोनावर मात!

30

केरळ : आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर केरळमधल्या एका ९३ वर्षीय वृद्धाने आणि त्याच्या ८८ वर्षीय पत्नीने कोरोनावर मात केली आहे. ज्या वयात शरीरही साथ सोडून देते, अशा वयात या जोडप्याने जीवघेण्या आजारावर मात करणे हे काही एका चमत्कारापेक्षा कमी नाही, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी या दोघांना ‘कोट्टायम मेडिकल कॉलेज’मधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी, या जोडप्याला निरोप देण्यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर हॉस्पीटल स्टाफही उपस्थित होता. डॉक्टरांनी टाळ्या वाजवून या वृद्ध जोडप्याच्या प्रेमाला आणि प्रखर इच्छाशक्तीला सलाम केला.
९३ वर्षीय थॉमस आणि ८८ वर्षांची त्यांची पत्नी मरियम्मा हे दोघेही कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. वयोमानानुसार हे दोघेही वेगवेगळ्या आजारांना लढा देत होते. उपचारा दरम्यान थॉमस यांना हृदयविकाराचा एक सौम्य झटकाही येऊन गेला. त्यांना श्वास घेणेही कठीण झाले होते. दोघांनाही डायबेटीजसोबत हायपरटेन्शनचाही त्रास होता. त्यामुळे त्यांना वेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. मरियम्मा यांनाही युरिनरी इन्फेक्शनसोबत बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सामना करावा लागला. जी नर्स या दोघांची काळजी घेत होती, तीलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या आठवड्यांत उपचारानंतर या जोडप्याची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना ताबडतोब डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. अधिक काळ रुग्णालयात राहणे हेदेखील त्यांच्यासाठी धोकादायक होते.
या दाम्पत्याचा मुलगा आणि त्याचे कुटुंब २० फेब्रुवारी रोजी इटलीमधून मायदेशात परतले होते. त्यानंतर कोरोनाच्या भीतीने हे संपूर्ण कुटुंब ५ मार्च रोजी करोना चाचणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते.
——————————-