रशियामध्ये ७. ५ क्षमतेचा भूकंप

22

मॉस्को – प्रशांत महासागराच्या उत्तरेला आज 7.5 क्षमतेच्या भूकंपाचा तीव्र धक्‍का बसला. या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे त्सुनामी लाटा उसळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. हवाई बेटांना या त्सुनामी लाटांचे तडाखे बसण्याचा इशारा नंतर मागे घेण्यात आला.

रशियाच्या दक्षिण-पूर्वेकडील कुरिल बेटाजवळ सावेरो भागापासून 219 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली 58 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे अमेरिकेच्या भूकंपमापक केंद्राने म्हटले आहे. या भूकंपामुळे कुरिल बेटांना त्सुनामी लाटांचा तडाखा बसण्याची भीती व्यक्‍त केली गेली होती. मात्र,नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. या भूकंपमुळे केवळ 1 फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. असा सुधारित इशारा देण्यात आला. हवाई बेटांना असलेल्या त्सुनामी लाटांचा धोक्‍याचा इशाराही कालांतराने मागे घेण्यात आला. या भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती, असे जपानच्या भूकंप मापक केंद्राने म्हटले आहे. या भूकंपामुळे जपानच्या किनाऱ्यावरच्या समुद्राच्या पातळीमध्ये काहीही फरक पडणार नसल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.