अमळनेरात उभारली आरोग्य रक्षक गुढी

36

अमळनेर ;-येथील आर. के. नगरातील रहिवासी शिंदे दांपत्याने ‘आरोग्य संरक्षक गुढी’ उभारून कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवक, पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनावर विजय मिळवण्याचा संदेश दिला.
वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी राज्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. प्रत्येकाच्या दारी विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली जाते. मात्र, यंदा गुढीपाडव्यावर कोरोना विषाणूचे सावट असल्याचे दिसून येत अाहे. या जागतिक आपत्तीला सामोरे जाताना शासन-प्रशासन, आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करत आहेत. या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी येथील आर. के. नगरातील रहिवासी रणजित शिंदे व शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे यांनी अापल्या घरासमाेर आरोग्य संरक्षक गुढी उभारली. कोरोनाविरुद्ध लढणारे आरोग्य, पोलिस, शासन-प्रशासनाला यश मिळावे, अशी प्रार्थना केली. लॉकडाऊनमध्ये शिस्त पाळायला लावणाऱ्या पोलिसांच्या काठीवर परिचारिकांचा पांढरा गणवेश, कोठीवर पोलिसांची टोपी आणि मध्यभागी डाॅक्टरांचा स्टेथोस्कोप टांगला. स्वतःची काळजी घेण्याचे प्रतिक म्हणून गुढीवर मास्क बांधण्यात आला. ही आरोग्य संरक्षक गुढी परिसरात कौतुकाचा विषय ठरली.