सर्प दंश झाल्याने फरकांडे येथील तरुणाचा मृत्यू

13

कासोदा;-येथून जवळच असलेल्या फरकांडे येथील हितेश सुभाष पाटील (वय २५) हा मंगळवारी रात्री शेतात भुईमुगाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. रात्री सर्पदंश झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
दररोज सकाळी ७ वाजता शेतातील वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत हितेश घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ प्रवीण सुभाष पाटील यांनी हितेशला पाहण्यासाठी शेत गाठले. यावेळी तो शेतात मृतावस्थेत आढळला. त्याच्या डाव्या हाताच्या बोटावर सर्पदंश झाल्याचे आढळले. यानंतर मृतदेह कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला गेला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख व डॉ. वाघ यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन कासोदा पोलिस ठाण्यात नोंद झाली तपास फौजदार भागवत पाटील हे करत आहेत. हितेशच्या पश्चात दोन मोठे भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.