पुण्यात बनवली शंभर टक्के स्वदेशी ‘कोरोना टेस्ट किट’

186

पुणे (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसने सर्व जग हादरून गेले आहे. जगातल्या १८० देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. दररोज काही हजार रुग्णांची त्यात भर पडत असून मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठी सध्या देशात मोजक्याच लॅब उपलब्ध आहेत. त्याची संख्या आता वाढविण्यात येत आहे. कोरोनाची चाचणी करण्यासाठीची किट ही विदेशातूनच मागवावी लागत होती. या अडचणीवर पुण्यातल्या एका कंपनीने मात केली असून अवघ्या ६ आठवड्यात संशोधन करून १०० टक्के स्वदेशी किट तयार केले आहे. देशातल्या संबंधीत सर्व संस्थांनी त्याला मान्यता दिली असून त्याचे उत्पादन आता सुरू होणार आहे.

पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रा.लि. या कंपनीने हे किट बनवले आहे. मोलक्यूलर डायग्नोस्टीक्स क्षेत्रात या कंपनीचे काम असून अशा विविध आजारांचे निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी तयार केल्या आहेत. सध्या भारत जर्मनीमधून या किट मागवतो आहे. मात्र जगभरातूनच या किट्सला मागणी असल्याने त्या मिळविण्यात अडचणीही येतात. त्याबरोबर त्या काहीशा महागड्याही आहेत, तर ही स्वदेशी किट स्वस्त असल्याची माहितीही दिली जात आहे.

आता स्वदेशी किट तयार झाल्याने कोराना चाचणीचा वेग वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकानुसार ही किट तयार करण्यात आली आहे. त्याला देशातल्या एफडीए आणि सेंट्रल ड्रग्स स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) या संस्थांनीही मान्यता दिली आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली आहे.