बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, हेक्टरी २५ हजारांची मदत द्या – विजयराज शिंदे

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी

बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करा. बुलढाणा येथे मंजूर कृषि महाविद्यालयास स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे नाव देवून महाविद्यालय तात्काळ सुरू करा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी आमदार विजयराज शिंदे दिले.
सोमवारी १५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यात आढावा बैठकीसाठी आले असता बुलढाणा शहरातील पोलीस कवायत मैदान येथील हॅलीपॅडवर विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून विविध मागण्याचे लेखी निवेदन दिले. निवेदनात जिल्ह्यात विशेषतः बुलढाणा व मोताळा तालुक्यात यावर्षी पाऊस सरासरी पेक्षा खूपच कमी पडल्याने उत्पादन अतिशय कमी झाले. कमी पावसामुळे यावर्षी सर्व नदी नाले कोरडे ठण असून जनावरांना सुध्दा पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही आहे. चारा नसल्याने जनावरांची सुद्धा उपासमार होणार आहे. प्रशासनाने खोटी पीक आणेवारी काढल्याने दुष्काळी परिस्थिती असतांनाही दुष्काळ जाहीर केल्या जात नाही. त्यामुळे वस्तुनिष्ठ काढण्याचे आदेश देण्यात यावे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍यांला हेक्टरी पंचविस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. बुलढाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा मी करीत आहे. तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देऊन कार्यन्वित करावे; बुलढाणा व मोताळा येथे नाफेडचे अतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करावे; जिल्ह्यातील नुतनीकरण केलेल्या पिककर्जामुळे वंचीत राहिलेल्या १० हजार शेतकर्‍यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी, अश्या आग्रही मागण्या निवेदनात नमूद आहे.
मंजूर कृषि महाविद्यालयास स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे नाव द्या
बुलढाणा येथील मंजूर कृषि महाविद्यालयास स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे नाव देवून महाविद्यालय तात्काळ सुरू करणे. बुलढाणा येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय मंजूर झालेले आहे. परंतु कृषी महाविद्यालय सुरू झालेले नाही. जिल्ह्याचे भूमिपुत्र स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर हे जिल्ह्याचे पहिले कृषी मंत्री असतानाच त्यांचे निधन झाले. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कृषि विकासासाठी खूप मोठे योगदान असल्याने बुलढाणा येथील मंजूर कृषि महाविद्यालयास स्व.भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय बुलढाणा असे नाव देऊन महाविद्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे.