कोणतीही ठोस घोषणा न करता आकडेमोड करुन मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा दौरा आटोपला

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी

बुलढाणा :- राज्यातील प्रलंबित रेल्वेमार्गासाठी राज्य व केंद्र शासनाने एकत्र कंपनी बनविली असून जे मार्ग फिजीबल आहे ते टप्प्याटप्प्याने पुर्ण केले जातील असे सांगून खामगाव जालना रेल्वे मार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बगल दिली. दुष्काळ घोषित करण्यासह जिल्ह्याबाबत कोणतीही ठोस अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दौर्‍यात न करता केवळ शासकीय योजनेची आकडेमोड करुन दौरा आटोपता घेतला.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक दिवसीय बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आले असता त्यांनी सर्व शासकीय योजनांचा, पीक परिस्थितीचा आढावा अधिकार्‍यांच्या बैठकीत घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या वेळी खामगावच्या सभेत आमचे सरकार निवडून द्या, मी खामगाव जालना रेल्वे मार्ग करेन, असा शब्द दिला होता. आता केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे हा रेल्वे मार्ग का होत नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राज्यात अनेक रेल्वे मार्ग प्रलंबित आहे, आम्ही राज्य व केंद्र शासनाची एक संयुक्त कंपनी तयार केली असून जे मार्ग फिजीबल असतील ते मार्ग टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात येतील असे सांगून खामगाव-जालना मार्गाच्या प्रश्नाला बगल दिली. तसेच जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरु असतील तर ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. यापुढे राज्य शासन अवैध धंदे व महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही व तशा सूचना पोलीस अधिकार्‍याला केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात ६९ टक्के सरासरी पाऊस पडला आहे. पिक आणेवारीची अंतिम आकडेवारी घेऊन सरकार दुष्काळ सदृश परिस्थिती ३० ऑक्टोबर नंतर घोषित करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून जिल्ह्यात पिण्याचा पाण्याच्या प्रश्न गंभीर असून धरणातील उपसा थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येकाला घर देताना कुठेही पैसा कमी पडणार नसून डीपीआर तयार करण्याचे आदेश जिल्ह्यातील अधिकार्‍यांना दिले आहेत. झोपडपट्टी व अतिक्रमणात राहणार्‍यांना मालकी हक्काचे पट्टे देवून पक्के घर शासन बांधून देणार असल्याचे सांगितले.
नाफेडने खरेदी केलेल्या धान्याचे चुकारे लवकरच शासन देईल असे सांगून गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त निधी सरकारने पालिकेला दिला आहे. सिंदखेडराजा विकास आराखड्याच्या सर्व कामाला मंजुरी दिली असून लवकरच ही कामे सुरु होतील असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगून घरपोच दारु ही बातमी कपोलकल्पीत असून पत्रकारांनी चुकीची बातमी देवून दिल्लीपर्यंत चर्चा घडवून आणली, असेही सांगितले. तसेच मंत्रीमंडळ विस्तारात बुलढाणा जिल्ह्याला प्रतिनिधीत्व देत असल्याचे सुतोवाच देखील मुख्यमंत्र्यांनी केले. एकंदरीत आज मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या दृष्टीने ठोस अशी कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे केवळ शासकीय योजनांची आकडेमोड करुन मुख्यमंत्री निघून गेले.