शिक्षण तर दूरच ; पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

साताऱ्यात बालकांवर भंगार गोळा करण्याची वेळ

लोकप्रतिनिधी अन प्रशासनाच्या कामगिरीचा नमुना

सातारा :- जगाच्या नकाशावर नोंद असलेल्या सातारा शहरात लहानग्या चिमुरड्यांवर पोटाची खळगी भरण्यासाठी अक्षरशः फेकून दिलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या गोळा करण्याची वेळ आली आहे. शहरात अनेक ठिकाणी बालके अशा प्रकारे बाटल्या आणि भंगार गोळा करत असून शिक्षण नावाचा शब्द त्यांनी अद्याप ऐकलेला नाही. हे चित्र पहिल्यानंतर ज्यांच्यावर मुलुभूत सुविधा देण्याची जबाबदारी आहे ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमके करतात तरी काय , असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद ते रेस्ट हाऊस रस्त्यालगत रविवारी दुपारी तेथील नाल्यातून पाच ते सहा वर्षाचा चिमुरडा हा प्लास्टिकच्या बाटल्या काढत होता. जवळपास पोते भरल्यानंतर ते पाठीवर घेताना उचलत देखील नव्हते. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक नऊ ते दहा वर्षाचा मुलगा तो देखील बाटल्या गोळा करताना दिसून आला. त्याने तब्बल दोन पोती भरली आणि अखेर दोघे ओझे उचलत उचलत त्या ठिकाणाहून निघून गेले. हे क्‍लेशदायक व वास्तववादी प्रातिनिधिक उदाहरण असले तरी या पूर्वीही शहरात अनेक ठिकाणी बालके कचरा कुंड्यांमधून बाटल्या गोळा करत असल्याचे दिसून आले आहे.
ह्या मुलांच्या घरची परिस्थिती बेताची. आई, अन बाप अशिक्षित अन्‌ मजबूर असल्यामुळे त्यांनी आपल्या सोबत पोरांना ही भंगार गोळा करायला लावले आहे. ह्या पोरांशी बोलल्यानंतर त्यांना ही शाळेत जावून शिकायचे ,खेळायचे, बागडायचे आहे असे ते सांगतात. त्यासाठी आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेतील भाग असलेल्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जेवढे प्रयत्न करायला हवेत तेवढे केलेले नाहीत. तर सरकारने राईट टू एज्युकेशन नावाचा कायदा केला. तर मागील वर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण देखील केले. त्या नंतर ही साताऱ्यात ह्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असेल तर सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.
राजे.थोडी ताकद इथं खर्च करा
साताऱ्याचे दोन्ही राजे खासदार व आमदार आहेत. नगरपालिका निवडणूक, आनेवाडी टोलनाका, विसर्जन तळे आणि पुन्हा आगामी निवडणुकीवरून दोघांमध्ये संघर्ष सुरू आहे. मात्र, हा संघर्ष करताना त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही जबाबदारी आहे. त्यापैकीच एक भाग म्हणून शहरात बालके पोटाची खळगी भरताना शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दोन्ही राजेंनी थोडी ताकद लावायला पाहिजे.
एखादे आंदोलन ह्यांच्यासाठी पण करा
सातारा शहरात अनेक पक्ष व सामाजिक संघटना कार्यरत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कोणतीही घटना घडली तर त्याचे पडसाद साताऱ्यात उमटतात. कोण निदर्शने, आंदोलन तर कोण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून मागणी करीत असतो. असे असताना ऐतिहासिक सातारा शहरातच पोरांवर भंगार गोळा करण्याची आणि शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत असेल तर प्रशासकीय व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी पक्ष अन्‌ संघटना पदाधिकाऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 5 =