प्रधानमंत्री आवास योजनेचे कामे त्वरीत पूर्ण करा – विभागीय आयुक्त राजाराम माने

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेची प्रलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण करावेत. तसेच प्राप्त निधी वेळेत खर्च करतांना कामांची गुणवत्ता राखावी. अशा सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांनी आज दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सन 2015-16 ते 17-18 या कालावधीच्या वार्षिक अहवाल वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, नाशिक विभागाचे उपआयुक्त (विकास) सुकदेव बनकर, उपआयुक्त श्रीमती प्रतिभा संगमेनेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, सर्व गटविकास अधिकारी, कार्यालय प्रमुख, शाखा प्रमूख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राजाराम माने पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एकंदरीत कृषी व आरोग्य विभागाची चांगली कामे झाली आहेत. यापुढेही सर्व संबंधित यंत्रणेने दर्जात्मक कामे करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण करावा. तसेच जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाव तलावांची कामे घ्यावीत त्याचबरोबर नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सेवा केद्र सुरु झाले पाहिजेत यासाठीही प्रयत्न करावेत.
यावेळी विभागीय आयुक्त माने यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना, आरोग्य सेवा केंद्र, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, समाज कल्याण, लोकसेवा हक्क्‍ सेवा, कृषी व पशुसंवर्धन विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

one + twenty =