जैन इरिगेशनच्या उलाढालीत 17 टक्के वाढीसह प्रगतीकडे वाटचाल- अनिल जैन

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

कंपनीच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रति शेअर रुपया लाभांश जाहीर

जळगाव :- गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी कंपनीची एकूणच सर्वांगिण प्रगती उत्तम आहे. देशासह विदेशातही कंपनीला मोठमोठे प्रोजेक्ट मिळाल्याने कंपनीची चौफेर प्रगती होत आहे. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कंपनीचे शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागल्याचे दिसते. त्यामुळेच कंपनीने यावर्षी भागधारकाना एक रुपया प्रतीशेअर लाभांश देण्याची घोषणा केली तसेच कंपनीने आर्थिक वर्षात एकूण उलाढालीत 17 टक्के वाढ नोंदविलेली आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केली.
जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. ची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्लास्टिक पार्क येथे कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर वसंत वर्टी, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, घनश्याम दास, डॉ. एच.पी. सिंग, अथांग जैन, दलिचंद जैन, गिरधारीलाल ओसवाल, सुनील देशपांडे, कंपनी सेक्रेटरी ए.व्ही. घोडगावकर, रमेश राठी हे संचालक उपस्थित होते. आरंभी गत वर्षभरात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत संचालकांच्या पुनर्नियुक्तीसह वेगवेगळे 12 ठराव होते ते मंजुर करण्यात आले. यावेळी भागधारक, जैन परिवारातील स्नुषा, अनुभूति स्कूल आणि रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

रिसोर्स टू रूट मुळे पाण्याचा शंभर टक्के वापर – अतुल जैन
कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी कंपनीच्या प्रगतीबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधला. दोन महत्त्वाच्या संकल्पना त्यांनी स्पष्ट केल्या. त्यात ‘रिसोर्स टू रूट’ व ’रिसोर्स टू टॅप’ यांचा समावेश आहे. रिसोर्स टू रूट या संकल्पनेत पाण्याचा शंभर टक्के कार्यक्षम वापर केला जाणार आहे. आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनुसार पाण्याचा अपव्यय होत असे. केवळ 30 टक्के पाणी पिकाच्या मुळापर्यंत पोहोचायचे. जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची कार्यक्षमता 100 टक्के वाढणार आहे. यात उंच, डोंगराळ भागातील सुपीक जमिनीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. ‘रिसोर्स टू टॅप’ या अंतर्गत अमृत योजना, पाणी पुरवठा योजनांचे प्रकल्प जैन इरिगेशन समर्थपणे पूर्ण करीत आहेत. कर्नाटकमधील हलियल हे शहर 24 तास पाणी पुरवठा करणारे देशातील पहिले शहर ठरले आहे. येथे कार्यान्वित योजनेसाठी जैन इरिगेशनचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्यावर एका कंट्रोल रुममधून नियंत्रण ठेवले जाते. स्वच्छ, शुद्ध व गुणवत्तापूर्ण पाणी या योजनेव्दारे पुरविले जात आहे. हलियल या शहराला पूर्वी दिवसाला 52 लाख लिटर्स पाणी लागत होते योजनेनंतर ते पाणी वापराचे प्रमाण 27 लाख लिटर्सवर आले आहे. जवळपास निम्मे पाण्याची बचत झालेली आहे. जैन इरिगेशन कंपनीचा लौकीक आता वॉटर युटिलीटी कंपनी म्हणूनही समोर येत आहे.

कंपनीची सर्वांगिण प्रगती अन् भविष्यही उत्तम – अनिल जैन
            कंपनीच्या प्रगतीबाबत कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी माहिती सादर केली. ते म्हणाले की, कंपनीच्या एकूण व्यवसायात 2016-17 च्या तुलनेत 2017-18 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण उलाढालीत 17 टक्के वाढ नोंदविली आहे. 1988 मध्ये लिस्टेड कंपनी झाली ती लहान होती परंतु त्याचे आता वैश्विक स्वरूप झाले आहे. प्लास्टिक शीट, पाईप, फुड प्रोसेसिंग, देश विदेशातील विविध प्रकल्प आणि कंपनीचे होणारे सर्व पातळीवरील काम याबाबत चर्चा केली. मध्यप्रदेशातील मोहनपुरा ही 9 हजार शेतकऱ्यांसाठी एकात्मिक सूक्ष्मसिंचन योजना सर्वात मोठी ठरलेली आहे. रवांडा आणि होंडूरस या प्रकल्पाबाबत देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. विशेष महत्त्वाचे म्हणजे मोठ्याभाऊंनी दिलेला वारसा कंपनी पुढे चालवित आहे. यामध्ये शास्त्रज्ञांसह सहकारी देखील महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. भागधारकांसाठी महत्त्वाची गोष्ट अशी की, गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रतीशेअर 50 पैसे तर गेल्या वर्षी 75 पैसे लाभांश कंपनीने दिला होता. यावर्षी कंपनीने प्रतीशेअर एक रुपया लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. भविष्यात सौर ऊर्जा खूप महत्त्वाची ठरणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात वर्षातून दोन पिके तर घेता येतीलच परंतु सौर ऊर्जेचे तिसरे पीक घेऊन त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. 

शेतकऱ्यांबाबत कल्याणकारी विचार करणारी कंपनी – अशोक जैन
कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील यावेळी सुसंवाद साधला. सर्वसाधारण सभेच्या अहवालाची संकल्पना स्पष्ट केली. ‘गुडनेस ऑल द वे’ सर्वदा मंगल अनंता पर्यंत. रोज सर्वांचे मंगल होवो अनंतापर्यंत या संकल्पनेबरोबर कंपनीची कल्याणकारी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मोठ्याभाऊंच्या शेतकऱ्यांच्या विकासासंदर्भात जी विचारधारा होती ती जैन कुटुंबातील पुढची पिढीही जोपासणार असल्याचे या संकल्पनेतून स्पष्ट होते. पाणी, अन्न आणि ऊर्जा यामध्ये बदल घडविण्याचे काम कंपनी करीत आहे. जैन सौर ऊर्जा, रिसोर्स टू रूट उगमापासून मुळापर्यंत ही संकल्पना कंपनीने अंमलात आणली आहे यामुळे शेतातील काळ्या मातीला हिरवेपणाचे मंगलकारी कोंदण मिळणार आहे. अतुल जैन यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.

गुडनेस ऑल द वे
जैन इरिगेशनच्या 31 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या छायाचित्रांसह प्रेरणादायी कोट वापरण्यात आले होते तर अहवालाची संकल्पना स्पष्ट करणारे गुडनेस ऑल द वे हा बॅकड्रॉप वापरण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

14 − five =