गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

  डॉ. विश्वास पाटील यांचे नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पमध्ये प्रतिपादन
जळगाव :- गांधीजी आजच्या काळात प्रासंगिक आहेत का? याबाबत आपल्याच देशात चर्चा होऊ शकते हे आपले दुर्दैव आहे. गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे. मात्र आजची सर्वच परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे, या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेच तर गांधी विचारांशिवाय पर्याय नाही असे ठाम प्रतिपादन डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलत होते. ‘गांधी प्रासंगिकता का मर्म’ या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. वीस राज्यातून आलेल्या तरुणांच्या समोर डॉ. विश्वास पाटील यांनी गांधीजींच्या तरुणपणातील अनेक उदाहरणं देऊन अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते पुढे म्हणाले, तरुणाई ही शक्ती आहे, प्रवाह आहे. तरुणपण ही वृत्ती आहे, वय नाही. ज्यांचे खांदे मजबुत आहेत आणि डोकं काम करतेय तो युवा. ज्याला येणाऱ्या काळाच्या पल्याड पाहता येते तो तरुण, अशी व्याख्या करून डॉ. पाटील पुढे म्हणाले, स्वत: एकटे उभे राहण्यात ध्यैर्य लागते, हे ध्यैर्य गांधीजींनी दाखवले होते. ते एकट्यानेच लढायला निघाले होते, समाज नंतर त्यांच्या पाठीशी उभे राहत गेले. गांधीजींची प्रासंगिकता का आहे? हा प्रश्न आपल्यकडे उपस्थित केला जातो हे दुर्दैवच आहे. जेव्हा की जगभरातील शंभर देशांत बा-बापू १५० हा उत्सव साजरा केला जाणार आहे. इतर देशात गांधीजी प्रासंगिक होत नाहीत.
गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून डॉ. पाटील पुढे म्हणाले, गांधीजींच्या जीवनात प्रामाणिकता होती. सत्य होते. सत्य ही जीवनधारा आहे, वर्तमानाला आकार देणारे आहे. वर्तमानात जगणाऱ्यांना कसलाही त्रास होत नाही. खादीच्या वापरातून त्यांनी स्वावलंबनाचा मंत्र दिला तर उपवासातून संयमाची शिकवण दिली. गांधीजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मातृसत्ता, गुरूसत्ता, पंचसत्ता, शास्त्रसत्ता आणि शस्त्रसत्तेला विरोध केला.
यावेळी उपस्थित युवकांनी देखील विविध प्रश्न विचारून गांधीजींच्या संदर्भातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. युवकांच्या काही प्रश्नांना महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी देखील उत्तरे दिली. सुरवातीला गांधी रिसर्च फाऊंडेशनचे जॉन चेल्लादुराई यांनी प्रास्ताविक केले. अश्विन झाला यांनी सुत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − 2 =