उल्हासनगरात एका अधिकाऱ्याच्या खांद्यावर 36 खात्यांचा भार!

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

उल्हासनगर :- यहाँ सबपुछ डुप्लिकेट मिलता है… असा एकेकाळी नावलौकिक असलेल्या उल्हासनगरचे नाव या ना त्या कारणाने नेहमी प्रकाशझोतात असते. महापालिकेतील अनेक मजेशीर किस्से उघड होतात. आता तर प्रशासनाने कहर केला असून महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण या एकाच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर तब्बल 36 खात्यांचा भार देण्यात आला आहे. प्रभारींच्या भरवशावर पालिकेचा कारभार सुरू असून नागरिकांची कामे होणार तरी कशी, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.
शासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, सचिव, मुख्य कर निर्धारक, कार्यकारी अभियंता, वैद्यकीय अधिकारी आदी महत्त्वाच्या पदावर प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवले जातात. मात्र उल्हासनगर पालिकेत मागील काही वर्षांपासून एका उपायुक्ताव्यतिरिक्त उर्वरित पदांवर नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रभारी पदभार देण्यात आला आहे.
शासनाकडून नियुक्त केलेले एकमेव उपायुक्त संतोष देहरकर यांच्याकडे 16 तर मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्याकडे 16 विभाग सोपवण्यात आले होते. देहरकर यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने ते दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे आयुक्त अच्युत हांगे यांनी सर्वच्या सर्व 36 विभागांच्या पदांचा पदभार विकास चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे. याबाबत पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना विचारले असता त्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.
कामे रखडणार
मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्याकडे सोपवलेल्या खात्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त, मुख्यालय उपायुक्त, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहन, भांडार, मालमत्ता, शिक्षण, विद्युत आदी विभागांचा समावेश आहे. चव्हाण यांच्यावर कामाचा बोजा वाढला असून त्याचा प्रमाण पालिकेच्या कामावर होत असून अनेक प्रकल्प तसेच महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे.