जळगाव येथील माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

संतोष पाटील स्वतः मागच्या टर्ममध्ये होते मनसेचे नगरसेवक
जळगाव :- महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका उषा पाटील यांचे पती आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोषअप्पा मोतीलाल पाटील यांच्यावर आज सोमवारी सकाळी गोळीबार करण्यात आल्याची घटना आर्यन पार्क भागात घडली. या घटनेत पाटील यांच्या छातीवर उजव्या बाजूने गोळी लागली असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष पाटील यांचे आर्यन पार्क भागात शेत असून, तेथे जाण्यासाठी सोमवारी सकाळी ते घरून निघाले. ते आर्यन पार्क भागात पोहोचले असता, मागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने पाटील यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर गोळी छाडली. पाटील यांच्या छातीवर उजव्या बाजूला गोळी लागली आहे. पाटील यांनी जखमी अवस्थेतच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती आपल्या मुलाला मोबाईलवर कळवली. यानंतर पाटील यांना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी दुचाकी, पिस्तुलच्या तीन बुलेट्स आढळून आल्या आहेत. यापैकी एक भरलेली, तर दोन रिकाम्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हल्लेखोर पोद्दार शाळेच्या दिशेने पळून गेला. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता आणि अंगात जॅकेट घातले होते. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.