सात मुलींनंतर मुलाचा हट्ट जिवावर बेतला, प्रसूतीत रक्तस्राव होऊन महिलेचा बाळासह मृत्यू

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

बीड :- माजलगाव येथील मीरा रामेश्वर एखंडे या 38 वर्षीय महिलेला आठव्यांदा बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते, मात्र ऐनवेळी रक्तस्राव होऊन परिस्थिती गंभीर झाल्याने आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
मीरा एखंडे हिला पहिल्या सात मुली आहेत तसेच दोन ते तीन वेळा गर्भपातही झालेला आहे. यावेळी ती गरोदर असताना तिला त्रास होऊ लागल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी आणण्यात आले. संध्याकाळी प्रसूती होत असताना तिला मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला उपलब्ध असलेले रक्तदेखील देण्यास सुरुवात केली. तरीदेखील रक्तस्त्राव थांबत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शहरातील स्त्रीरोगतज्ञांना पाचारण केले.
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल परदेशी, डॉ. गजानन रुद्रावर व डॉ. राजेश रुद्रावर तसेच परिचारिकांनी तब्बल तीन तास मेहनत घेऊनही मीरा आणि तिच्या मुलाला वाचविण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनदेखील नियतीने डाव साधल्याने परिसरात हळहळ व्यक्त झाली. सात मुलींच्या नंतर मुलगा असताना आई व मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकानी एकच हंबरडा फोडल्याचे हृदयद्रावक दृश्यही दिसत होते.
महिलेच्या प्रसूतीवेळी खूप मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्यामुळे बाळ अगोदरच दगावले होते, परंतु महिलेला वाचविण्यासाठी त्यांना रक्त देऊन रक्तस्राव काही केल्या थांगत नव्हता. तीन तास प्रयत्नांची शर्थ करूनही यश आले नाही.