पुण्यात सैनिक पत्नीला उडविण्याचा प्रयत्न

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पुणे :- आपल्या मुलीला घरी घेऊन चाललेल्या सैनिकाच्या पत्नीला उडविण्याचा प्रयत्न गुरुवारी (ता. 27) रात्री साडेनऊच्या सुमारास येवलेवाडी येथील अरिहंत प्रथमेश सोसायटीच्या बाहेर झाला. पाठलाग करून चार गुंडांनी धमकी देऊन चोवीस तास उलटले तरीही कोंढवा पोलिसांकडून अद्याप दखल न घेतल्याने सोसायटी व परिसरात संताप व्यक्त होत आहे.
वर्षा कुरे असे या महिलेचे नाव असून, त्यांचे पती सचिन हे लष्करात सेवेत आहेत. आपल्या दहा वर्षांच्या मुलीला दुचाकीवरून घेऊन वर्षा या येवलेवाडी येथील घरी म्हणजे अरिहंत प्रथमेश सोसायटीच्या दिशेने जात होत्या. त्या वेळी भरधाव मोटार (एमएच 12 केजे 0304) अगदी जवळून घासून गेली. गाडीत चार टारगट मुले होती. कुरे यांनी जाब विचारला आणि त्या सोसायटीत गेल्या. त्यांच्या मागोमाग ही चारही मुले गाडी घेऊन सोसायटीत आले आणि महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. सचिन कुरे सुटीवर असल्याने पुण्यातच होते. ते वरून खाली आले. या चौघांनी सचिन कुरे व वर्षा कुरे यांना मारून टाकण्याची धमकी दिली आणि निघून गेले.
रात्री सचिन कुरे व वर्षा यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली. आज सकाळी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याची प्रत घेतली, तर पोलिसांनी अदखलपात्र तक्रार दाखल केल्याचे लक्षात आले. गाडी नंबर आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, तरीही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या पत्नीबाबत असा प्रकार झाल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक नितीन बोधे यांच्याकडे विचारणा केली असता, चौकशी करून सांगतो. एवढेच उत्तर मिळाले.