१ इंचदेखील जमीन बुलेट ट्रेनसाठी देणार नाही – जिग्नेश मेवाणी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

वसई :- गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी वसईत झालेल्या पर्यावरण संवर्धन मेळाव्यात बुलेट ट्रेनसाठी १ इंचदेखील जमीन देणार नाही, असा इशारा दिला. त्यांनी यावेळी बुलेट ट्रेनला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
हजारो ग्रामस्थांनी वसईत नव्याने विकसित होणाऱ्या बुलेट ट्रेन व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखड्याच्या प्रकल्पाला विरोध केला आहे. स्थानिक या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. पर्यावरण संवर्धन समिती तर्फे पर्यावरण संवर्धन मेळावा याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, भूमीसेना संस्थापक काळूराम धोदडे, फा.फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखरप्रभू , समीर वर्तक इत्यादी मान्यवर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
जिग्नेश मेवाणी यांनी यावेळी बोलताना मोदी आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की जो काही विकास होत आहे किंवा होणार आहे तो उद्योगपतींना गृहीत धरून केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मोदी हे ‘झूठ के शहंशहा ‘ असे म्हणत सर्व ऑस्कर त्यांनाच द्यावेत ते खरे नटसम्राट आहेत. २० रुपयांपेक्षा कमी देशातील ८० कोटी लोक कमवतात. ४० कोटी पेक्षा जास्त झोपड्या आणि बेघर आहेत. मग बुलेट ट्रेनमध्ये बसणार कोण, असा सवाल त्यांनी केला. देशातील हिंदूंवर मोदींनी खऱ्या अर्थाने अन्याय केला आहे. मोदी हे देशाचे नटसम्राट असून त्यांना ऑस्कर दिला जावा अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, की देशातील हिंदू धोक्यात असल्याची आवई उठविली जात आहे, पण खरे बघितले तर सध्याच्या घडीला देशातील संविधान धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. माझे महाराष्ट्रशी नाते शिवराय आणि भीमरायांचे आहे, मला कितीही विरोध करा मी महाराष्ट्रात येत राहणारच असे त्यांनी ठणकावले. सरदार पटेल यांच्या पुतळ्यावरून त्यांनी टीका केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ कोटी खर्च करून पुतळा उभारण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. मात्र आम्हाला पुतळा नको, त्याऐवजी ग्रंथालय आणि रुग्णालय उभारा असेही त्यांनी सांगितले.