मुंबई पोलीसांनी नाकारली ‘भीम आर्मी’च्या सभेला परवानगी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

मुंबई :- मुंबईतील ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांवर भेदभाव करुन आवाज दडपल्याचा आरोप भीम आर्मीच्या मुंबईतील नेत्यांनी केला आहे.
शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांच्या मुंबईतील कार्यक्रमास आमच्या संघटनेने विरोध केल्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक आम्हाला परवानगी देत नसल्याचा दावा भीम आर्मीने केला आहे. वरळीतील जांबोरी मैदानात तसेच दादरच्या चैत्यभूमी परिसरात भीम आर्मीने कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी मागितली होती.
चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण वरळी पोलिसांनी देऊन परवानगी नाकारली. तर सुट्टीचा दिवस असल्याने अनुयायांची गर्दी होत असल्याने तिथेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होत असल्याचे दादर पोलिसांनी सांगून परवानगी देण्यास नकार दिला आहे.