जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे मेथीची भाजी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

धरणगाव :- धरणगाव मध्ये शेतातील कच्ची मेथीची भाजी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या महिलेने खाल्लेल्या मेथीवर किटकनाशके फवारली होती. त्यामुळेच विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये समोर आले आहे. जळगावमधील धरणगाव येथे राहणाऱ्या अंजूबाई पाटील यांनी शेतामधील मेथीची भाजी घरी आणून ती खाल्ली. त्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये विषबाधा झाल्याचे अंजूबाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अंजूबाई पाटील यांचे शवविच्छेदन झाले असून प्राथमिक अहवालात त्यांच्या शरिरामध्ये किटकनाशकांचा अंश आढळून आला.
अंजूबाई यांनी ज्या शेतातली भाजी खाल्ली तेथे चार दिवसापूर्वीच किटकनाशकांची फवारणी झाली होती. त्यामुळेच भाजी न धुता कच्चीच खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.