गावकऱ्यांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प करावा – आमदार उन्मेश पाटील

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

चाळीसगाव :-माझे गाव पाणीदार केल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प सर्वांनी करावा. यासाठी सर्वांनी अंतर्मनापासून काम करावे, असे प्रतिपादन आमदान उन्मेश पाटील यांनी केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 76 वा तालुका म्हणून चाळीसगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची कार्यशाळा हंस थिएटर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, गट विकास अधिकारी अतुल पाटील, दिनेश बोरसे, पाणी फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, तालुका समन्वयक विजय कोळी, सुनिल पाटील उपस्थित होते.
आमदार पुढे म्हणाले की, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील 75 तालुक्यांचा समावेश होता. आता 76 वा तालुका म्हणून चाळीसगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रात पहिल्या तीन क्रमांकात येण्यासाठी सर्वांनी मनापासून काम केले पाहिजे. आपल्या गावासाठी, मातीसाठी गावाच्या पाण्यासाठी प्रत्येकाने हे काम अंतर्मनातून करुन ही एक चळवळ सुरु करावयाची आहे. या चळवळीचे आपण साक्षीदार व शिल्पकार झाले पाहिजे. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व 136 गावांनी सहभागी व्हावे. यासाठी लागणारी व्यवस्था, यंत्रणा उभारुन, लोकसहभाग, श्रमदान करुन यातून आपण गुणवंतही होवू आणि भागयवंतही होवू. पाणी फाऊंडेशनच्या सुत्रानुसार प्रशिक्षणासाठी गावातून दोन महिला व तीन पुरुष जलदूत म्हणून पाठवावे. आपण पैशाचे नियोजन करतो त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन केले पाहिजे. ज्या प्रमाणात पाणी वापरतो त्यानुसार पाणी जमिनीत जिरवत नाही. त्यामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरण केले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तहसिलदार म्हणाले की, दुष्काळाशी सामना करण्यासठी पाणी फाऊंडेशनतर्फे सुरु केलेल्या या चळवळीत सर्व लोकांनी सहभागी व्हावे. मागील वर्षी जिल्हयातील पारोळा व अमळनेर तालुक्यात हे काम सुरु होते. यात जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रशासन एखाद्या कामात सहभागी होते तेव्हा ती चळवळ होते. आगामी काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. हे संकट येवू नये यासाठी सर्व गावांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. यावेळी दाखविण्यात आलेल्या चित्रफीत यांचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, आणि तालुका समन्वयक विजय कोळी यांनी स्पर्धेत भाग कसा घ्यावयाचा, प्रत्येक कामास मिळणारे गुण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील लोकांनी सहभाग घेवून केलेल्या कामासंदर्भात चित्रफीत दाखविण्यात आली.
यावेळी तालुक्यातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.