केंद्रीय पथकाने केली दगडी व जुनोने येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

                                    शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली परिस्थिती

जळगाव :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकाने आज जिल्ह्यातील दगडी प्र. अमळनेर तालुका पारोळा व जुनोने तालुका अमळनेर या गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली.
केंद्र शासनाच्या या पथकामध्ये केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर. डी. देशपांडे, सहसचिव छावी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश आहे.
या पथकाने आज सकाळी दगडी प्र. अमळनेर येथील बाळु नथा पाटील व नारायण श्रीराम पाटील या शेतक-यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. व त्यांच्याशी संवाद साधून दरवर्षी कोणती पीके घेतात, पीक उत्पादनसाठी झालेला खर्च, मिळालेले उत्पन्न याबाबतची माहिती जाणुन घेतली. त्याचबरोबर या पथकाने जुनोने तालुका अमळनेर येथील शेतकरी रमेश पाटील यांच्या शेतातील कापूस व ज्वारी पिकांची पाहणी केली. यावेळी पथकासोबत मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पथकाने शेतात ठिबक सिंचनाचा वापर करतात का, किसान क्रेडीट कार्ड वापरता का, गावात पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे, गावातील जनावरांची संख्या, त्यांना पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी व चारा यांची उपलब्धता, गावात रोजगाराची साधने काय आहेत ? आदि बाबींवर ग्रामस्थांशी चर्चा केली.
त्याचबरोबर या पथकाने टंचाई परिस्थिती असलेल्या या गावांमध्ये मनेरगा, पोकरा व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत करता येणा-या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्यात.
दगडी प्र. अमळनेर येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झाली परंतु यावर्षी पाऊसच न पडल्याने टंचाई जाणवत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. यावर पथक प्रमुख छावी झा म्हटल्या की, राज्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत नक्कीच चांगली कामे झाली आहेत. यावेळी पथकाने गावातील संरपंचाशी संवाद साधून गावातील पिण्याच्या पाण्याबाबतची माहिती जाणुन घेतली. त्यानंतर दोन दिवसाच्या दौरानंतर हे पथक धुळे जिल्ह्याकडे रवाना झाले.
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पुनवर्सन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, एरंडोल उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, अमळनेरचे प्रांताधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय कृषि अधिकारी जाधवर, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, आदिंसह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.