भाजप शहराध्यक्षकडून पोलीस निरीक्षकास मारहाण

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

चोपडा :- चोपडा येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मारहाण केली. या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्यासह तिघांवर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा येथे गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त शिवाजी चौकात कार्यक्रम आयजित केला होता. याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांची चार चाकी क्र. एमएच 19 सीएफ 3493 तेथून जात होती. वाहतूक नियमन सदराखाली पोलीस कर्मचारी विजय निकम यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र चालकाने गाडी न थांबविता तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ अडवली. याचा राग आल्याने भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माजी शहराध्यक्ष राजू चिरंजीलाल शर्मा यांना त्या ठिकाणी बोलावले. दोघांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. ही घटना माहीत झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे तिथे पोहचले आणि दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पो.नि. नजनपाटील यांच्याशीच हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावत जाऊन कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यात पो.नि. नजनपाटील यांच्या उजव्या हातास दुखापत झाली आहे.
या प्रकरणी भाजपाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना चौकशी कामी पोलीस ठाण्यात आणत असताना पोलीस ठाण्याच्या गेटवर भाजप कार्यकर्ता मनिष पारिख याने देखील पोलिसांशी हुज्जत घालून ‘तुमच्या बापाला फोन लावतो, एका तासात तुमची वर्दी उतरवितो’ अशा धमक्या दिल्या. यावरुन भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष राजु शर्मा व मनिष पारिख यांच्याविरुध्द शासकिय कामात अडथळा आणला म्हणून चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत. यावेळी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.