कर्ज देण्याचे आमिष दाखवून आठ जणांची फसवणूक

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पुणे :- कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याप्रकरणी जसबिरसिंह सेहगल (वय 28, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला कोटक महिंद्रा बॅंकेकडून बोलत असल्याचे सांगून “तुम्हाला पर्सनल लोन हवे आहे का,’ असे विचारले. कर्जाची गरज असल्यामुळे त्यांनी संमती दर्शवली. त्यावर आरोपीने त्यांना कर्ज घेण्यासाठी ओळखपत्र, बॅंक स्टेटमेंट, रहिवासी पुरावा आणि रद्द केलेला धनादेश देण्यास सांगितले. त्यानंतर तो धनादेश बॅंकेत वटवून आरोपीने 15 हजार रुपयांची फसवणूक केली. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली. त्यात आरोपींनी आणखी दोघांची 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूरज किसन माने (वय 31, रा. संतोषनगर, कात्रज), मंगेश अशोक माने (वय 24, रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि स्वप्नील तेजेंद्र ठाकूर (वय 29, रा. म्हाडा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लॅपटॉप, सहा मोबाईल, दहा सिम कार्ड, तीन बनावट आधार कार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि सहायक आयुक्त नीलेश मोरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राधिका फडके, पोलिस उपनिरीक्षक अनिता पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आर्थिक फसवणूक झाल्यास संबंधितांनी सायबर गुन्हे शाखेच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.