केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली परिस्थिती सकारात्मक अहवाल शासनास सादर करणार
जळगाव :- पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे चार सदस्यीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकात केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर.डी.देशपांडे, सहसचिव छावी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे संचालक ए.के.तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश आहे.
या पथकाने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.
पथकाने आज सायंकाळी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावाला भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यां समवेत जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पथकाने श्रीमती कमलबाई आत्माराम पाटील यांच्या शेतातील कापूस पीकाची पाहणी केली. यावेळी श्रीमती पाटील यांनी सांगितले की, यावर्षी तीन एकर शेतात आठ बॅग कापसाची लागवड केली होती. यामध्ये फक्त तीन क्विंटल कापूस निघाला. मागील वर्षी मात्र 10 क्विंटल कापूस निघाला होता. यावर्षी दुष्काळी परिस्थीतीमुळे सध्या पोट पाणी भरण्यासाठी मोलमजूरी करावी लागत असल्याचे सांगितले.
यानंतर या पथकाने सरपंच संदिप पाटील यांच्याशी संवाद साधून गावातील लोकसंख्या, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांची संख्या आदिबाबतची माहिती घेतली. याबाबत माहिती देतांना सरपंच पाटील म्हणाले की, गावातील लोकसंख्या 1138 असून यासाठी गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकच विहिर आहे. तिलाही पुरशे पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना 15 दिवसांनी पिण्याचे पाणी पुरवावे लागते. त्यामुळे गावात लवकरच पिण्याच्या पाण्याचा टॅंकर सुरु करावा लागेल. पथकाने पीक विमाबाबत विचारणा केली असता शेत जमिनीवर बोजा असल्याने कर्ज उपलब्ध होत नाही.
त्यानंतर या पथकाने मंगलाबाई पांडुरंग पवार यांच्या शेतातील तुर पिकाची पहाणी केली. या शेतामध्ये फक्त दिड क्विंटल तुर निघाल्यामुळे कुंटुंबातील सदस्यांना रोजगारासाठी बाहेरगावी जावे लागत आहे असे सांगितले.
त्यानंतर या पथकाने शेखर चिंधू पाटील यांच्या शेतातील मका पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अडीच एकर मध्ये मका पिक घेतले असून अपूर्या पावसामुळे फक्त 6 क्विंटल उत्पादन आले आहे. मागील वर्षी 41 क्विंटल उत्पादन आले होते. यावेळी या पथकाने त्यांच्या कुटुंबातील जनावरांची संख्या, तसेच कुंटुंबातील सदस्यांची संख्या, मुलांच्या शैक्षणिक संदर्भात आस्थेवाईकपणे चौकशी करुन माहिती घेतली. टंचाईची परिस्थिती असल्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी पथकाकडे मागणी केली.
पथकाने उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करतांना यावर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थिती यापूर्वी कधी अनुभवली होती का? याबाबत विचारणा केली असता मागील चार-पाच वर्षात पूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवलेली होती असे उपस्थितांनी पथकला सांगितले.
गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी मनेरगा अतंर्गत रोजगार हमीच्या कामाचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी जलसंधारण सचिव श्री. डवले यांनी कृषि विभाग, गट विकास अधिकारी आणि सरपंच यांना दिल्यात.
प्रत्यक्ष पाहणी केलेली वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेली माहिती याचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे आश्वासन पथकाने उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांना दिले.
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, पाचोरा प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, पुनवर्सन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, एरंडोल उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तहसिलदार टिळेकर यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.