जळगाव जिल्हा ग्रंथोत्सवानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रम

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

  ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, काव्यसंमेलन, ग्रंथजत्रा, व्याख्यान, परिसंवादाचे आयोजन

जळगाव : – उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 10 व 11 डिसेंबर रोजी जळगाव येथे ग्रंथोत्सव -2018 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथ दिंडी, ग्रंथप्रदर्शन व विक्रीसोबत ग्रंथजत्रा, व्याख्यान, परिसंवाद, काव्यसंमेलन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे हे उपस्थित होते.
या दोन दिवसीय ग्रंथोत्सवासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये माध्यमिक‍ शिक्षणाधिकारी देविदास महाजन, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ प्रतिनिधी युवराज माळी, महाराष्ट्र साहित्य परिषद, जळगाव शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष किसन पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल अत्रे हे सदस्य तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे हे सदस्‍य सचिव म्हणून काम बघत आहे.
ग्रंथोत्सवाची सुरुवात 10 डिसेंबर रोजी ग्रंथदिडीने होणार आहे. ग्रंथदिंडी बहिणाबाई उद्यान येथून सकाळी नऊ वाजता निघेल. यावेळी महापौर सीमा भोळे व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, माध्यमिक‍ शिक्षणाधिकारी देविदास महाजन उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन होईल. या समारंभाचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तर विशेष अतिथी म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, खासदार ए. टी. पाटील, श्रीमती रक्षा खडसे, विधान परिषदेचे सदस्य डॉ. सुधीर तांबे, किशोर दराडे, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, आमदार सर्वश्री. एकनाथराव खडसे, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीषदादा चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड, प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक, नाशिक सचिन जोपुळे उपस्थित राहणार आहे.
ग्रंथोत्सावाच्या ठिकाणी दोनही दिवशी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवातील पहिल्या सत्राला दुपारी तीन वाजता सुरुवात होईल. यात ‘सार्वजनिक ग्रंथालयांची आधुनिकतेकडे वाटचाल’ या विषयावरील परिसंवाद होईल. त्र्यंबक कापडे, विनय पाटील, राहुल रनाळकर व विनय श्रीनाथ कंची यांचा सहभाग असेल. दुसरे सत्र दुपारी 5 ते सायंकाळी 8 या वेळात होईल. यात काव्यसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किसन पाटील हे राहणार आहे. यात अशोक सोनवणे, अशोक कोतवाल प्रा. वा. ना. आंधळे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, माया धुप्पड, डॉ. अशोक कोळी, अ. फ. भालेराव, सत्यजित साळवे, प्रा. डॉ. रमेश माने, डॉ. अस्मिता गुरव व सुखदेव वाघ यांचा सहभाग असेल. तसेच संध्याकाळी 6 ते 8 या वेळात विसुभाऊ बापट यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेला ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम होणार आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या अनुदान योजनेतंर्गत वाचन संस्कृतीचा प्रचार होण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकरी कार्यालय, जळगावतर्फे मंगळवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता लेवा बोर्डिग हॉल येथे ग्रंथ जत्रा आयोजित करण्यात आली असून ग्रंथ जत्रा सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुली असणार आहे.
ग्रंथ जत्रा कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे हे राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्रंथालय संचालनालयाचे, ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांची विशेष उपस्थिती लाभणार असून प्रमुख अतिथी म्हणून राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,पश्चिम विभाग, मुंबई चे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ, जिल्हा‍ नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडीत हे उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 1.30 दरम्यान ‘21 व्या शतकातील आव्हाने आणि गांधी विचारांची आवश्यकता’ या विषयावर इतिहासतज्ञ आणि परिक्षा नियंत्रक, गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव भुजंगराव बोबडे यांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 5 दरम्यान स्पर्धा परीक्षा संभ्रम आणि वास्तव या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, गोपाल दर्जी, विकास भदाणे हे सहभागी होणार आहेत तर सांयकाळी 5 ते 7 दरम्यान झी. टी. व्ही. मराठी हास्यसम्राट उपविजेते डॉ. मिर्झा रुफी अहमद बेग यांच्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा तुफान विनोदी कार्यक्रम होणार असून त्यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व ग्रंथप्रेमी नागरीकांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.