अयोध्येतील ३५ एकर जागा हिंदुंना, १५ एकर मुस्लिमांना आणि उर्वरीत बौद्धांना द्या!

जनसंग्राम न्युज नेटवर्क / प्रतिनिधी

नागपूर :- अयोध्येतील ३५ एकर जागा हिंदुंना, १५ एकर मुस्लिमांना आणि उर्वरीत जागा बौद्धांना द्या. कारण तेथे तिघांनाही दावा केला आहे, असा नवा फार्म्युला आरपीआयचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्र परिषदेत दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत जाण्याने वा संतांच्या दबावामुळे अयोध्येत राम मंदिर होणार नाही. तर ते न्यायालयाच्या निकालामुळेच होईल. त्यामुळे राम मंदिरासाठी अध्यादेश न काढता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करण्यात यावी, असे आपले स्पष्ट मत असल्याचे आठवले म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवर मंदिर आणि मशिदीच्या पूर्वी बौद्ध मंदिर होते. उत्खननात बौद्ध अवशेष सापडले आहेत. शंकराचार्यांच्या काळात हिंदु मतांचा प्रचार-प्रसार झाल्यानंतर हिंदुंनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर बांधले आणि मुस्लिम आक्रमकांनी मंदिर पाडून मशिद बांधली. त्यामुळे हा प्रश्न सामोपचारानेच सोडवावा, असे आठवले म्हणाले. अयोध्येत राम मंदिराच्या जागी मशिद होती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राम मंदिर बांधताना मुस्लिमांना टाळता येणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्यात यावा, असे आठवले म्हणाले.
येत्या २० जानेवारी २०१९ रोजी नागपूर येथे आरपीआयचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात वेगळ्या विदर्भाचा ठराव करण्यात येईल. तसेच १० फेब्रुवारी २०१९ रोजी संभाजीनगर येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. एमआयएम आणि वंचित आघाडीने घेतलेल्या मैदानावरच आम्ही मेळावा घेणार असून फक्त मराठवाड्यातील जनतेच्या उपस्थितीने मैदान भरवून दाखवू असे आठवले यांनी स्पष्ट केले.
देशभरात २० कोटी एकर पडीक जमीन आहे. ती सर्व भूमिहीनांना वाटप करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. उत्तर प्रदेशात एका शहराला गोडसेचे नाव देण्याची मागणी होत आहे. इतर कोणाचेही नाव दिले तरी चालेल. पण गोडसेचे नाव देण्यापूर्वी विचार करावा, असे आठवले म्हणाले.