सातारा जिल्ह्यात सर्वत्र भागात अवकाळी पाऊस

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

सातारा :- सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. दुष्काळी भाग असणार्‍या फलटण, खंडाळा, माण आणि खटाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहर आणि काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कमालीचा उकाडा निर्माण झाला होता. ढगाळ वातावरण झाल्यानंतरही रात्रभर पावसाने हुलकावणी दिली होती मात्र, पहाटेपासूनच काही भागात पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहर आणि परिसरात सकाळी 7 च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. शाळा अद्याप सुरू न झाल्याने नागरिक घराच्या बाहेरच पडले नाहीत. जिल्ह्यात जावली, वाई, खंडाळा, लोणंद, दहिवडी, फलटण या भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा आदी पिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून नाले वाहू लागले आहेत. ऊस पिकाला पावसामुळे उभारी मिळाली आहे.

सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरदार सुरू असून या पावसाने मजुरांची धावपळ उडाली. ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसल्याने साहित्य व धान्य भिजून नुकसान झाले आहे. ओढ्याचे पाणी शेतात घुसून पेरलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाने भात काढणी खोळंबली असून, तर अनेक ठिकाणी शेतातील सखल भागांमध्ये पाणी साचून, ओढा व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

ढगाळ वातावरण व त्यामध्ये जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांना व चाकरमान्या बाहेर पडणे अवघड झाले.