मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार – आठवले

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

भोपाळ :- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्षाने 13 उमेदवार उतरविले असून अन्य 217 जागांवर रिपाइंचा भाजपला पाठिंबा असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भोपाळ येथे केली. भोपाळ येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते.
मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागा असून त्यापैकी 217 जागांवर रिपाइं ने भाजपला पाठिंबा दिला आहे.13 जागांवर रिपाइं चे उमेदवार निवडणूक लढत आहेत. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचे काम चांगले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या ही देशभरातील विकासाच्या कामांचा करिष्मा मध्यप्रदेशात चालणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात भाजप रिपाइं बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप रिपाइं उमेदवारांना विजयी करण्यासाठी जोमाने प्रचाराला लागण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.