कृषि गणनेस येणाऱ्यांना शेतक-यांनी सहकार्य करावे कृषि विभागाचे आवाहन

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव : – भारत सरकारच्या सुचनेनुसार दहाव्या कृषी गणनेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कृषि गणना टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ महसुल विभागामार्फत पूर्ण करण्यात आला असून त्यातंर्गत गावनिहाय, खातेदारनिहाय व जमीनधारणा गटनिहाय क्षेत्राची माहिती संकलित करण्यात आली आहे.
यापुढील टप्पा क्र. तीन अंतर्गत इनपूट सर्व्हेचे काम कृषि विभागामार्फत करण्यात येणार आहे. या इनपूट सर्व्हेचा उद्देश हा विविध कृषि निविष्ठांच्या वापराविषयी जमीन धारणा वर्गवारीनुसार सविस्तर माहिती गोळा करणे आहे. यातंर्गत प्रत्येक तालुक्यातील ७ टक्के गावांची निवड यादृच्छीक (रॅन्डम) पध्दतीने उप आयुक्त कृषि गणना, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केलेली आहे.
निवड केलेल्या गावातील विविध पाच जमीन धारणा वर्गवारीनुसार प्रत्येकी चार शेतक-यांची यादृच्छीक (रॅन्डम) पध्दतीने निवड केली जाणार आहे. सन २०१६-१७ या वर्षामध्ये शेतक-यांनी वापर केलेले बियाणे, खते, किटकनाशके, औजारे, कृषि यंत्रे व पतपुरवठा इ. बाबत माहिती घेतली जाणार आहे. या माहितीचे संकलन करुन कृषि निविष्ठांचा वापर, उपलब्धता, पुरवठा इ. बाबत भविष्यात शासनाला नियोजन करण्यासाठी उपयोग होणार आहे. या माहितीचा वापर अन्य कोणत्याही कारणासाठी करण्यात येणार नाही. याची नोंद शेतकरी बांधवांनी घ्यावी.
त्यामुळे इनपूट सर्व्हे अंतर्गत निवड झालेल्या गावातील, निवडलेल्या शेतक-यांनी आपणांकडे सर्व्हेक्षणाकरीता येणा-या कृषि विभागाकडील मंडळ कृषि अधिकारी यांना अचुक व वस्तुनिष्ठ माहिती देणेबाबत सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.