सन 2011 पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे निर्देश

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

एस आर ए कार्यलयात मुंबईतील विविध झोपड्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर ना रामदास आठवलेंनी घेतली बैठक

मुंबई : – सन 2011 पर्यंत झोपड्यांना कायदेशीर अधिकृत मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महापालिका ; झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ; मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि सर्व शासनाच्या संबंधित विभागांनी तात्काळ करावी अशी सूचना करून रस्ते विकास ; झोपडपट्टी पुनर्वसन; आदी योजनांत सन 2011 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत दर्जा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची संबंधित अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करण्याची सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.

बांद्रा पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर ना रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत घेण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता; एस आर ए चे आयुक्त दीपक कपूर; तसेच सर्व संबंधित शासकिय विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे ; जिल्हा अध्यक्ष विवेक पवार ; अमित तांबे; हेमंत रणपिसे ; रतन अस्वारे आदी अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सांताक्रूझ येथील भीमवाडा खोतवाडी येथील प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजना लवकर मार्गी लावण्याच्या किचकट प्रश्नावर यावेळी दीर्घ चर्चा झाली. तसेच मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसासात बाधित होणाऱ्या झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत ;रेल्वे जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत; कांदळवन; वन विभागाच्या जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन; संजय गांधी राष्ट्रीय उद्यान; आरे कॉलनी;पवई येथील आदिवासी पाड्यां मधील आदिवासी आणि बिगर आदिवासी झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईतील विक्रोळी येथील भीमछाया नगर;दहिसर येथील गणपत पाटील नगर आदी झोपड्यांचे सन 2011 च्या शासन निर्णयानुसार त्यांना संरक्षण आणि नागरी सुविधा पुरविण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यात अनेक झोपडपट्ट्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले.
मुंबईतील झोपड्यांच्या प्रश्नांवर केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन झोपडीवासीयांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याबद्दल बैठकीस आलेल्या झोपडीवासीयांनी ना रामदास आठवले यांचे आभार मानले तसेच रिपाइं झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमीत वजाळे यांनी बैठकीचे आयोजन कुशलतेने केल्याबद्दल त्यांचेही कौतुक रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.