पुणे न्यायालयाच्या भिंतीवर ‘राम मंदिर नाही तर मत नाही’ असे झळकले पोस्टर्स

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

पुणे :- सध्या देशात राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच पुणे न्यायालयाच्या भिंतीवर जी पोस्टर्स लावण्यात आली आहेत त्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना NoMandirNoVote असा हॅशटॅग तयार करून २०१९ च्या आधी मंदिर निर्मितीचा कायदा आणा नाहीतर मत विसरा असे आवाहन करण्यात आले आहे. राम मंदिराचा हा प्रश्न १९९२ पासून म्हणजेच बाबरी पाडली गेली तेव्हापासून न्यायप्रविष्ट असल्याचे आपल्याला ठाऊक आहेच. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली आहे. योगी आदित्यनाथ अयोध्येत राम मंदिर किंवा रामाचा पुतळा याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. अशा सगळ्या वातावरणात ही पोस्टर्स लागली आहेत.
राम मंदिराचा प्रश्न धार्मिक भावनेचा प्रश्न करत भाजपने आत्तापर्यंत मते मिळवली आहेत. तर हाच मुद्दा आता २०१९ मध्येही चर्चेला येतो आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता अध्यादेश काढा अशी मागणी साधूसंतांकडून आणि शिवसेनेकडूनही होते आहे. पण सरकारने अद्याप अध्यादेश काढण्यासंबंधी कोणतीही चर्चा सुरु केलेली नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही पावलेही उचललेली नाहीत. राम मंदिराचा प्रश्न पुढे करून मते मागायची ही भाजपची जुनी खेळी आहे. पण मतदारांनी आता मंदिर नाही तर मत नाही अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे राम मंदिरा प्रश्नाचे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.