स्वच्छतेसाठी नगरसेविकेच्या पतीची गांधीगिरी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- आपल्या प्रभागात स्वच्छता अबाधित रहावी, यासाठी महानगरपालिका प्रभाग क्र.9 च्या नगरसेविका प्रतिभा गजानन देशमुख यांचे पती गजानन देशमुख मामा यांनी महापालिकेचे ट्रॅक्टर बोलावून प्रभागातील कचरा उचलला. जेथून कचरा उचलण्यात आला तेथे येथे कचरा टाकू नये असे, फलक लावले. जेणेकरून नागरिकांना तशी सवय लागेल.
शहरात सर्वत्र घाण, कचर्‍याच्या समस्या वाढल्या आहेत. शहरातील बाजारपेठ, विविध मार्केट येथे फेरफटका मारला असता ठिकठिकाणी कचरा घाण दिसून येते.
डेंगू मलेरिया साथरोगांत वाढ
शहरात सध्या डेंगूने थैमान घातले आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे आदींनाही डेंगु झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याचप्रमाणे मलेरिया, तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. चिकुनगुनियानेही डोके वर काढले आहे. शहरात सर्वत्र घाण, कचरा व सांडपाणी तुंबल्यामुळे डास, माशांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे शहरात साथरोग पसरले आहेत. विविध आजारांचा सामना यामुळे नागरिकांना करावा लागत आहे.
साथरोगांचा सामना मात्र कर्तव्यात कसूर
शहरातील प्रत्येक प्रभाग, कॉलनी, गल्ली बोळात, वस्त्यांत साथरोगांनी नागरिकांना पछाडले आहे. नागरिक साथरोगांचा सामना करत आहेत मात्र परिसरातील कचरा हटविणे, घाण होवू न देणे, सांडपाण्याचा निचरा करण्याच्या कर्तव्याचा विसर नागरिकांना पडत आहे. प्रत्येक नागरिकांने आपली जबाबदारी पार पाडली तर साथरोगांना आपोआप आळा बसेल. घर व परिसरातील कचरा गोळा करून घंटागाडीतच टाकायला हवा मात्र नागरिक तो रस्त्यावर मनमानीने टाकून देत असल्याने अस्वच्छता वाढून रोगराईला आमंत्रण मिळते, यासाठी गजानन मामांचा आदर्श बाळगून शहरातील स्वच्छता अबाधीत राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.