आंघोळ घालत असताना अचानक मृतदेह बोलू लागला

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जयपूर :- जन्म आणि मृत्यू परमेश्वराच्या हाती असतो असे म्हटलं जातं. पण राजस्थानमधील झुंझुनू खेतडी भागात मृत्यूच्या ४ तासानंतर अंत्यसंस्काराच्या विधीदरम्यान मृतदेह बोलू लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुद्धराम गुर्जर (95 ) असे त्यांचे नाव आहे.
झुंझुनू खेतडी भागातील बबाई गावात राहणाऱ्या बुद्धराम यांचा वृद्धापकाळाने सोमवारी रात्री 1.30 च्या सुमारास निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलांनी बालूराम व रणजित यांनी नातेवाईकांना वडील गेल्याचे कळवले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. पहाटेपर्यंत सर्व नातेवाईक त्यांच्या घरी पोहचले. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यास सुरुवात करण्यात आली. वडिलांना मुखाग्नी देण्यासाठी बालूराम व रणजित यांनी मुंडणही केले. त्यानंतर विधीप्रमाणे मृतदेहाची आंघोळ घालण्यासाठी नातेवाईक पुढे आले. पण मृतदेहाच्या अंगावर पाणी टाकण्यास सुरूवात करताच मृतदेह हालचाल करत असल्याचे काहींच्या लक्षात आले.

त्यानंतर आंघोळीसाठी खुर्चीवर बसवण्यात आलेल्या मृतदेह खाटेवर ठेवण्यात आला. त्यानंतर जे काही झाले त्यावर विश्वास ठेवणे सगळ्यांसाठीच अवघड होते. खाटेवर बुद्धराम यांच्या मृतदेहाला झोपवताच तो अचानक बोलू लागला. ‘मी कुठे आहे, तुम्ही सगळे इथे काय करताय’ मृतदेहाच्या तोंडून हे शब्द ऐकून अनेकांच्या अंगाला दरदरून घाम फुटला.

तर वडील पुन्हा जिवंत झाल्याचे बघून बालूराम व रणजित यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागला. हा दैवी चमत्कार असल्याचे मानून नातेवाईकांनी बुद्धराम यांच्या नावाचा एकच जल्लोष केला. त्यानंतर सगळ्यांनी देवाचे आभार मानत स्मशानातच भजन कीर्तनाला सुरूवात केली.