वरणगावात अनोळखी ईसमाचा संशयास्पद मृत्यू ; खुनाचा संशय

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार मृत्यूचे कारण ; पोलिसांची माहिती
भुसावळ :- तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गाजवळील लोककल्याण रुग्णालयाजवळील एका गॅरेजजवळ 30 ते 35 वर्षीय मुक्या इसमाचा चेहरा ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी पहाटे आढळल्याने गावासह परीसरात खळबळ उडाली आहे. या इसमाचा कुणीतरी दगडाने चेहरा ठेचल्याची शक्यता असून पोलिसांनी मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मुका व काहीसा गतिमंद असलेला इसम वरणगावात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मुका असल्याने त्याचे नेमके नावही कुणालाही माहित नाही. मंगळवारी पहाटे त्याचा चेहरा ठेचलेला मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुक्ताईनगरचे उपअधीक्षक सुभाष नेवे, वरणगावच्या सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचा संशय
मुका व गतिमंद असलेल्या इसमास पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा चेहरा ठेचला गेला असावा व प्रकरण अंगलट यायला नको म्हणून रस्त्यावरून त्याचा मृतदेह उचलून गॅरेजजवळ टाकण्यात आला असावा, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली. मयताच्या अंगावर टाकलेले ब्लँकेट हे एखाद्या वाहनातील असल्याची शक्यता आहे. श्‍वान पथकाला पाचारण केल्यानंतर ते जागेवरच घुटमळले तर तज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे म्हणाले.