‘स्मशानभूमी’अभावी ‘पुनतगाव’मध्ये मरणानंतरही संपेनात नशिबातील यातना रस्त्यावरच ग्रामस्थांकडून अंत्यविधी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

नेवासे :-हयातभर गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा व स्वतःच्याच अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसावी, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे. याचाच प्रत्य पुनतगाव येथील विठ्ठल रामभाऊ गंधारे यांच्या कुटुंबीयांना आला. गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी गंधारे यांनी पाठपुरावा केला. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्‍न येथे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गवात स्मशानभूमी व्हावी, यासाठी अखेरपर्यंत लढा देणारे विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचे सोमवारी निधन झाले. आत्तापर्यंत येथील ग्रामस्थ नदीतच अंत्यविधी करत होते. मात्र जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी वाहत आहे. स्मशानभूमीच नसल्याने गंधारे यांचा अंत्यविधी पुनतगाव -खुपटी या मुख्य रस्त्यावरच करावा लागला.
पुनतगाव हे नेवासे-श्रीरामपूर तालुक्‍यातील शेवटचे टोक असलेले सीमेवरील गाव. येथे सर्व जाती-धर्मातील लोक असून गाव जरी छोटे असले तरी राजकीयदृष्ट्या महत्वाचे आहे. या गावातील पुढाऱ्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची राजकीय पदे भोगली आहेत. तरीही हे गाव विकासापासून वंचित आहे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या या गावची लोकसंख्या 3000 ते 3500 हजार आहे. प्रवरा नदीला पाणी असल्यास येथील नागरिकांना नदीच्या काठावर व रस्त्याच्या कडे- काठावर अंत्यविधी करण्याची वेळ येते. यामुळे येथील ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
गावात मूलभूत सुविधांचा अभाव; पुनर्वसित गावाचा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने खुंटला विकास
स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनंतरही पुनतगावमध्ये पायाभूत सेवा सुविधांचा अभाव असल्याने स्थानिकांना आजही वैज्ञानिक स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांच्या विळख्यात संपूर्ण गाव अडकले आहे. आत्तापर्यंतच्या सरकारने या गावाच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी दुर्लक्ष केल्याने गावाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील नागरिक हलाखीचे जीवन जगत असून या परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, आरोग्य सुविधांचा अभाव आहे. येथे पुरेसे पाणी नाही, व्यायाम शाळा नाही अशा विविध समस्येने ग्रामस्थ त्रस्त आहेत.
‘स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गावातील भूदान यज्ञ जमीन त्याकामी मिळण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर त्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सदर जागेची पाहणी करून पंचनामाही केला. पण वर्ष होऊनदेखील कुठलीच कार्यवाही नाही. अंत्यविधीस आजही गैरसोय असून स्मशानभूमीचा प्रश्न जैसे थेच आहे.
-उज्वला वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य.
पुनतगावकडे जाणारा रस्ता हा कच्चा व खड्डेमय असून, तो अरुंद आहे. आजारी रुग्णाला दवाखान्यात जाता येत नसल्याने उपचाराऐवजी अनेकदा मरण पदरी पडते. शेतीसह प्रवरा नदीच्या पात्रात व परिसरातील गावात दुध विकणे हा व्यवसाय आहे. अनेकांची शेती प्रवरा नदीच्या लगत असल्याने नाशिक पट्यात अतिरिक्त पाऊस होऊन या परिसराची शेती पाण्याखाली जाते व येथील नागरिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. या परिसरात बॅंक नसल्याने शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी यांना पाचेगाव किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी जावे लागते. पण दुर्देवाने रस्ता खराब असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
‘स्मशानभूमीसाठी गावात जमीन उपलब्ध नसल्याने नेवासा तहसीलदार पाटील यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी जागा मिळाल्यावर हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले आहे.
-दीपक धनगे, सामाजिक कार्यकर्ते.
शेतकऱ्यांना अनेक वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात तर या गावात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होते, प्रवरेचा मुख्य भाग असल्याने कायम सतर्कतेचा इशारा या परिसराला असतो. त्यामुळे सुमारे तीन-चार महिने या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटतो. या गावला कायमच विजेचा तुटवडा असतो, पावसाळ्यात रस्त्याअभावी दवाखान्यातच जाता येत नसल्याने निसर्गातील पारंपारिक वस्तूच्या साह्यानेच रुग्णावर उपचार केले जातात. तर स्त्रियांची प्रसूतीही घरातच केली जाते. पुनतगावचा विकास रस्ता नसल्याने खुंटला आहे परिणामी या गावात आरोग्यसुविधा देखील उपलब्ध नाहीत.
ग्रामस्थांना जीवनवश्‍यक वस्तूंसाठी 25 किलोमीटर प्रवास करून नेवासा किंवा श्रीरामपूरला जावे लागते. पुनतगावचा विकास जर वर्षानुवर्ष होत नसेल, तर या लोकांनी कोणाकडे हात पसरावेत ? या गावाला स्वातंत्र्य मिळून तरी काय उपयोग ? येथील गावांनी विकास काय असतो हेच पहिले नाही हे गाव दोन तालुक्‍याच्या सीमेवर असल्याने तर विकासापासून दूर नाही ना? या गावाचा आदिवासी भागात करावा अशी मागणी येथील तरुण करत आहेत. या गावाला एक ना अनेक समस्यांनी ग्रासले आहे, त्यामुळे येथील नागरिक विकासाच्या बाबतीत अनेक प्रश्‍न उपस्थित करत आहेत.