नाशिक मध्ये दमदार पाऊस

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

नाशिक :- नाशिकच्या आडगाव व नाशिकरोड परिसरात आज दुपारी दमदार पाऊस झाला.
शहराच्या इतर भागात, तसेच जिह्यात काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. नाशिकच्या आडगाव येथील कोणार्कनगर, वृंदावननगर भागात दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. येथे तब्बल तासभर दमदार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. नाशिकरोड, उपनगर या भागातही अर्धातास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत रिमझिम सरी बरसत होत्या. नाशिक शहर, इंदिरानगर, म्हसरूळ, गंगापूररोड, सिडको येथे तुरळक पाऊस झाला. वादळी वाऱयामुळे भाभानगर येथे एक, तर अशोका मार्ग परिसरात दोन झाडे उन्मळून पडली. पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. जिह्यात वणी, दिंडोरी, सटाणा, जायखेडा आणि ओझर येथेही रिमझिम पाऊस झाला. इतरत्र ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.