तलाठ्याच्या अंगावर वाळूचे डंपर घालणाऱ्यास 5 वर्षांची शिक्षा

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

जळगाव :- अवैध प्रकारे वाळू वाहतूक करत असलेले डंपर अडविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित तलाठय़ाच्या अंगावर वाळूचे डंपर नेणाऱया चालकास व डंपरमालकास आज शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांनी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
मेहरुण परिसराचे तत्कालीन तलाठी आनंदा फकिरा जोशी हे 10 सप्टेंबर 2012 रोजी आपली डय़ुटी बजावत असताना त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डंपरचा चालक सत्यभान भागवत रंधे (29, रा. खेडी) याला 5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड तसेच पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली 1 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाकली. तर डंपरमालक कृष्णा भागवत कोळी (41, रा. जळगाव) यास वाळूचोरीप्रकरणी 2 वर्षे सक्तमजुरी व पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली 1 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच संबंधित डंपर जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रदीप एम. महाजन यांनी कामकाज पाहिले.