सासुरवाडीत जावईबापूंचा “धिंगाणा’ चौघांविरुद्ध गुन्हा

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

गर्भवती पत्नी, सासूसह मेव्हणीला मारहाण
पुणे :- जावायाने आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह सासू आणि मेव्हणीला लोखंडी पाइपने मारहाण केली. तसेच घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करुन घरातील साहित्याची देखील तोडफोड केली. हा प्रकार शनिवारी केसनंद लाडबा वस्ती येथे घडला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात जावयासह तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावई आकाश गणपत माने (रा. कात्रज), त्याचे साथीदार निशीकांत उर्फ ब्लॅक ननवरे (रा. ताडिवाला रस्ता) आणि आप्पा घाडगे (रा.वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सासूने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिल्पा, पौर्णिमा आणि पतीसह लाडबा वस्ती येथे राहतात. तसेच आरोपी आकाश माने हादेखील त्याची पत्नी शिल्पासह तेथे राहतो. शिल्पा ही आठ महिन्यांची गर्भवती आहे. काही दिवसांपूर्वी आकाश कात्रज येथे आईकडे गेला. मात्र, तो शनिवारी रात्री एकच्या सुमारास त्याच्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरासमोर आला. यानंतर त्याने घरासमोर लावलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. याचा आवाज ऐकून फिर्यादी व त्यांच्या मुली जाग्या झाल्या. दरम्यान आकाशने साथीदारांसह दुकानाच्या दारातून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील साहित्याची तोडफोड करण्यास सुरूवात केली. या तिघींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिघींना लोखंडी पाइपने मारहाण करुन शिवीगाळ केली. यात फिर्यादी यांना मुका मार लागला आहे तर गर्भवती शिल्पा जखमी झाली आहे. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.