पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच लोकांची सर्वाधिक पसंती

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी

नवी दिल्ली :- अद्यापही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान पदासाठी सर्वात जास्त पसंती असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अद्याप पिछाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंजने केले असून दक्षिण भारत वगळता इतर सर्व ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती दर्शवण्यात आली आहे.
सर्वेक्षणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४६ टक्के लोकांनी मत दिले असून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर राहुल गांधींना ३२ टक्के लोकांनी मत दिले आहे. २२ टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नसल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण २५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले असून यामध्ये जवळपास दोन लाख लोकांनी सहभाग घेतला.
सर्वेक्षणानुसार, उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतात राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. पण राहुल गांधींनी दक्षिण भारतात पंतप्रधान मोदींवर मात केली असून तिथे त्यांची लोकप्रियता वाढली असल्याचे पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंजने म्हटले आहे. उत्तर भारतात नरेंद्र मोदींना ४५ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला असून, राहुल गांधींना २७ टक्के मते आहेत. पूर्व भारतात मोदींना ५० तर राहुल गांधींना २५ टक्के मते मिळाली आहेत.