भाजप आघाडीमध्ये सामील झाल्यास शरद पवार यांना मिळू शकते उपपंतप्रधान पद – रामदास आठवले

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी

वर्धा :- विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार आहेत तर मोदी हे भाजपकडे एकच आहेत. शरद पवार राहुल गांधींना पाठिंबा देणार नाही तर राहुल गांधी शरद पवारांना पाठिंबा देणार नाही. पण जर का भाजप आघाडीमध्ये शरद पवार आले तर पवार यांना उपपंतप्रधान पद मिळू शकते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.
यावेळी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम युतीवरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी हातमिळवणी केली असली तरी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. डॉ. बाबासाहेबांचे प्रकाश आंबेडकर हे नातू असल्याने त्यांचा आम्ही सन्मानच करतो. जर आमच्या टीममध्ये ते आले तर त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास मी तयार आहे. मी दलितांना न्याय मिळवून देण्याचे राजकारण करतो असे ते म्हणाले आहेत.
संविधान भाजप सरकारमुळे धोक्यात येत असल्याचा गवगवा विरोधी पक्ष करीत आहे, पण काँग्रेसने संविधान वाचवण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाचवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्ही संविधान वाचवण्यासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
संविधान जाळल्याने ते धोक्यात येण्याइतके कमजोर नाही, अशी टिपणी त्यांनी केली. दलित हा शब्द अपमानकारक नाही. जो आर्थिक व सामाजिक मागासलेला आहे, तो दलित होय. त्यांनी यावेळी भाजप सरकारच्या कामगिरीवर जनता खूष असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, देशात एकमेकांविरुद्ध लढण्याचे वातावरण तयार केले जात आहे. सर्व एकटय़ा मोदींविरुद्ध एकत्र येत आहे. पण आम्हाला त्याचा आनंदच आहे. ते त्यांना ६० वर्षांत जमले नाही ते मोदी सरकारने पाच वर्षांत करण्याचा प्रयत्न केला. भाजप, सेना व आरपीआय सरकारच्या काळात दलितांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. इंदू मिलची जागा ताब्यात आली असून ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षाही मोठे स्मारक ६ डिसेंबर २०२० पूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे २०१९ मध्येही मोदीच परत पंतप्रधान होतील, असे आठवले म्हणाले.