हिंदू भावनेच्या आधारे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकत नाही – ओवेसी

जनसंग्राम न्यूज नेटवर्क /प्रतिनिधी
नवी दिल्ली :-  कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा आदर करुन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा, अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून हिंदू भावनेच्या आधारे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकत नसल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी भाईंदरमधील पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले होते. राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण न्यायालयात प्रकरण असल्याने विलंब होत आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा हा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदूच्या भावनेचा आदर करुन निर्णय द्यावा. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने या प्रकरणावर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी भय्याजी जोशी यांच्या विधानाचा ट्विटरवरुन समाचार घेतला. हिंदू भावनेच्या आधारे सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही. भारताच्या संविधानाला ते अजूनही मानायला तयार नाही. संविधानात आस्था, भावनेला स्थान नाही. येथे फक्त न्यायालाच स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन ओवेसी यांनी वारंवार भाजप व संघावर टीका केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववाद्यांना आव्हान दिले होते. राम मंदिर प्रकरणात अध्यादेश आणून दाखवाच असे खुले आव्हान ओवेसी यांनी भाजपबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्वहिंदू परिषदेच्या सर्व नेत्यांना दिले होते.