दोन वर्ष आश्रमात डांबून महिलेवर अत्याचार

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

नवी दिल्ली :- उपचारासाठी गेलेल्या एका महिलेला आश्रमातील बाबाने तब्बल दोन वर्ष डांबून ठेऊन तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये मध्ये हि खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने कशीबशी आपली सूटका करून घेत दिल्ली महिला आयोगाकडे धाव घेतल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर गोरखपूर पोलिसांनी आरोपी बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोरखपूरच्या परमेश्वरपूरमध्ये या बाबाचा आश्रम आहे. पीडित महिला दोन वर्षांपूर्वी एका महिलेच्या सांगण्यावरून आश्रमात उपचारासाठी गेली होती. मात्र महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत बाबाने तिला आश्रमातच डांबून ठेवले. बाबाला विरोध केल्यास पीडितेला तिच्या कुटुंबासहीत ठार करण्याची धमकी बाबा देत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. बाबाच्या जाचाला कंटाळून कशीतरी स्वत:ची सूटका करून घेतली. या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटिस बजावून आरोपी बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.