आठ दिवसांत पेट्रोल 2 रूपयांनी तर डिझेल रूपयाने स्वस्त

जनसंग्राम न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

                           दिवाळीच्या तोंडावर जनसामान्यांना काहीसा दिलासा
नवी दिल्ली :- मागील काही दिवस इंधन दरांच्या भडक्‍याने होरपळलेल्या जनसामान्यांना दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठ दिवसांत लिटरमागे पेट्रोल जवळपास 2 रूपयांनी तर डिझेल सुमारे 1 रूपयाने स्वस्त झाले आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 4 ऑक्‍टोबरला इंधन दरांनी उच्चांकी पातळी गाठली. त्यादिवशी पेट्रोल 84 रूपयांवर तर डिझेल 75.45 रूपयांवर गेले. त्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यादिवशी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 1.50 रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच, सार्वजनिक इंधन कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर 1 रूपया अनुदान देण्यास सांगितले. अर्थात, त्यानंतरही काही दिवस पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम राहिली.
मात्र, मागील आठ दिवसांपासून इंधन दरांच्या कपातीचे सत्र सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर कमी झाल्याने आणि अमेरिकी डॉलरच्या तुलतेन सुरू असलेली रूपयाच्या मुल्याची घसरण थांबल्याचा तो परिणाम आहे. त्यामुळे दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलचा दर 80.85 रूपये तर डिझेलचा दर 74.73 रूपये इतका झाला.